Site icon Sprouts News

आप्पासाहेबांनी राजकीय व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार घेणे टाळावे !

ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे विशेषतः रायगड, ठाणे, नवी मुंबईत चांगले कार्य आहे. मागील ३० वर्षांहून अधिक काळ त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आध्यत्मिक कार्य केलेले आहे.

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Editorial

भारतातील इतर बाबाबुवा म्हणजेच रामदेवबाबा, श्री. श्री. रविशंकर, सद्गुरू जग्गी, बाबा राम रहीम यांच्यासारखे आप्पासाहेब हे भोंदू नाहीत. गंडे- दोरे, तंत्र- मंत्र, तांत्रिक विद्या यांसारख्या फालतू कर्मकांडांवर त्यांचा विश्वास नाही. त्याऐवजी ते स्वतः संत रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या दासबोध ग्रंथावर निरूपण करतात व इतरांनाही दासबोध फॉलो करायला सांगतात.

कोरोनाचा अपवाद वगळता, ते दरवर्षी आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रम घेतात. मात्र त्याची कुठेही प्रसिद्धी केली जात नाही, की वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जात नाहीत. या कार्यक्रमांना त्यांचे लाखो श्री सदस्य शिस्तबद्ध रीतीने हजर असतात.

मात्र कुठेही अनुचित प्रकार आजतागायत घडलेला नाही. खऱ्या अर्थाने आप्पासाहेब हे महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूर हिरा आहे. त्यांच्या या महान कार्यामुळेच आजही लाखो नि:स्वार्थी श्री सदस्य कार्यरत आहेत. मात्र त्यामुळेच त्यांचा अनेकदा राजकीय ‘वापर’ केला जातो.

दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी ‘लोकमत’ या वृत्तपत्राने स्वतःच्या ब्रॅंडिंगसाठी कार्यक्रम घेतलेला होता. त्यावेळी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आप्पासाहेब यांना गौरविले होते.

वास्तविक त्याच वेळी त्यांनी हा पुरस्कार नाकारायला हवा होता. नानासाहेब, आप्पासाहेब व सचिनदादा यांचे आध्यात्मिक व सामाजिक कार्य फार मोठे आहे.  

आप्पासाहेबांनी ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला, त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला.

मात्र त्यांनी राजकीय व गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या हाताने दिला जाणारा कोणताही पुरस्कार नाकारणे आवश्यक आहे, असे ‘स्प्राऊट्स’च्या टीमला विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

सध्याच्या युगात एखादा अपवाद वगळता शेकडा ९९ टक्के राजकीय व्यक्ती या महाभ्रष्टच असतात. त्यामुळे पुरस्कार देणारी व्यक्ती ही किमान स्वच्छ चारित्र्याची असणे आवश्यक असते. आप्पासाहेब यांचे कार्य आभाळाएवढे आहे, हे त्यांच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागेल.

मात्र त्यामुळेच त्यांनी अशा महाभ्रष्ट पुढाऱ्यांच्या हस्ते हे पुरस्कार स्वीकारू नयेत, असे ‘स्प्राऊट्स’च्या टीमचे मत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ( व त्यांच्या कार्यक्रमातील लांबलेल्या कंटाळलेल्या भाषणांमुळे ) लाखो श्री सदस्यांना ५ ते ६ तासांहून अधिक वेळ रणरणत्या उन्हात बसावे लागले व त्यामुळे आजमितीला १५ ते १६ ( खरा  आकडा हा दुप्पट असण्याची शक्यता आहे) श्री सदस्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले.

मुख्यमंत्री शिंदे यांना सध्या जनाधार उरलेला नाही, त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. अशा वैफल्यग्रस्त स्थितीत केवळ राजकीय लाभ घेण्यासाठीच शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या सरकारी जाहिराती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या होत्या.

यातून त्यांनी त्यांचे स्वतः:चे ब्रॅण्डिंग करुन घेतले व २५ लाख रुपयांच्या पुरस्कारासाठी ५० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे.

आजही काही श्री सदस्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र शिंदे सरकारने प्रसारमाध्यमांना जाहिराती दिल्यामुळे मृतांच्या खऱ्या आकड्यांवर बोलायला पत्रकार तयार नाहीत. वास्तविक या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायला पाहिजे, त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात यायला हवी.

सीटिंग जजेसच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती बसवायला हवी. आज अमित शहा गृहमंत्री  व शिंदे मुख्यमंत्री आहेत, उद्या कदाचित ते या पदावर नसतीलही, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांनी सुरु केलेला हा पायंडा अत्यंत घातक आहे. 

Exit mobile version