Site icon Sprouts News

केवळ ७ महिन्यांत शिंदे सरकारची जाहिरातींवर ४२ कोटींची उधळपट्टी

महाराष्ट्रातील शिंदे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

शिंदे सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी सत्तेत आल्यापासूनच्या मागील ७ महिन्यांत तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केला आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’कडे आलेली आहे.

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला. त्यासाठी त्यांनी तत्कालीन मूळ शिवसेना फोडली व भाजपबरोबर नवीन सरकार बसविले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या.

छोट्या छोट्या सरकारी उपक्रमांच्याही शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिलेल्या आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंबंधी माहिती मागवली होती. त्यानुसार सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याने ही आकडेवारी यादव यांना दिलेली आहे.

जनतेच्या मिळणाऱ्या करातून या पैशाची उधळपट्टी करण्याचा पराक्रम शिंदे यांनी केलेला आहे. याआधीच्या म्हणजेच उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या काळीही इतकी कधीही उधळपट्टी झालेली नव्हती. मात्र शिंदे हे सतत प्रसिद्धीच्या मागे आहेत आणि त्यामुळेच ते जनतेच्या पैशाचा दुरूपयोग करीत आहे.

‘हर घर तिरंगा’ हा केंद्र सरकारचा उपक्रम होता. या उपक्रमात दिल्लीश्वरांची मर्जी राखणे शिंदे सरकारला आवश्यक होते. या उपक्रमावर तब्बल १० कोटी ६१ लाख ५६८ रुपये खर्च करण्यात आला.

‘बूस्टर डोस’च्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ८६ लाख ७० हजार ३४४ रुपये खर्च करण्यात आला, तर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या उपक्रमाच्या जाहिरातीसाठी ४ कोटी ७२ लाख ५८ हजार १४८ रुपये खर्च करण्यात आला, अशी माहितीही नमूद करण्यात आलेली आहे.

पत्रकारांना मिंधे करण्यासाठी शिंदे सरकार आघाडीवर
पत्रकारांना खुश करण्याची कोणतीही संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडत नाहीत. ‘दिवाळी गिफ्ट’ देण्याचे असेच एक निमित्त करण्यात आलेले होते. ठाणे येथील पत्रकारांना खुश करण्यासाठी शिंदे यांच्याकडून डिजिटल घड्याळ वाटण्यात आले, तर विधिमंडळ व मंत्रालय बिट सांभाळणाऱ्या पत्रकारांना प्रत्येकी १0 ग्रॅम सोने (अंदाजे किंमत ५२ हजार रुपये ) असलेले नाणे वाटण्यात आले.

संपादक व जनरल मॅनेजर असणाऱ्या प्रत्येकाला Apple iPhone 14 Pro Max (256 GB) हा दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल वाटण्यात आला. मात्र त्यातही भ्रष्टाचार झाला. कित्येक पत्रकारांचे यादीत नाव असूनही त्यांना हे दिवाळी गिफ्ट मिळालेच नाही त्यामुळे ते शिंदे यांच्यावर नाराज झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे, अशी सूत्रांची विश्वसनीय माहिती आहे.

Exit mobile version