Site icon Sprouts News

जेजुरीमधील खंडोबाच्या मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार 

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. स्थानिक विश्वस्त मंडळ, राजकीय पुढारी व धर्मादाय आयुक्त यांच्या सहकार्यातून हा भ्रष्टाचार दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात खंडोबा देवाचे मंदिर आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशविदेशातील भाविक येतात. या भाविकांकडून श्री. मार्तंड देवसंस्थान या व्यवस्थापनाला वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात. मात्र यामध्ये मोठ्या भ्रष्टाचार केला जातो. इतकेच नव्हे तर भाविकांकडून मिळालेल्या देणग्यांसंबंधीची कोणतीही माहिती भाविकांनाच नव्हे तर माजी विश्वस्तांनाही देण्यात येत नाही, असा खळबळजनक आरोप ट्रस्टच्या माजी विश्वस्त नंदा राऊत यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे आहे.

जेजुरी देवस्थानाला ४०० वर्षांचा इतिहास आहे. या ४०० वर्षांच्या काळात देवस्थानाला जुने राजे व भाविकांनी कोट्यवधी रुपये किंमतीच्या जमिनी इनाम ( गिफ्ट ) म्हणून दिलेल्या आहेत. आतापर्यंत जेजुरी गाव व त्याबाहेरील पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये २५० हून अधिक एकर जमिनी आहेत. या जमिनीमधून कोणत्याही स्वरूपाचा मोबदला देवस्थानाला मिळत नाही. तिचे हक्क देवसंस्थानकडेच आहेत. मात्र दस्तरखुद्द माजी विश्वस्त सुनील आसवलीकर हे स्वतःच देवस्थानच्या जागेवर वर्षानुवर्षे बेकायदेशीररीत्या राहत आहेत. एकंदरीतच या सर्व जागा हडप करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे देवस्थानला महिन्याकाठी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहेत.

दस्तरखुद्द विश्वस्तच वर्षानुवर्षे भ्रष्टाचार करत आहेत, त्यामुळे या विश्वस्तांची पाळेमुळे या जमिनी हडप करणाऱ्यांना चांगलीच माहिती आहेत. यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या न्यायाने या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या आहेत व त्यामुळे त्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. याबाबत मंदिराचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे यांना संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.

श्री. मार्तंड देवस्थानात विविध पध्द्तीने मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे भाविक सुरेंद्र कदम यांनी देवस्थानाकडे इंटर्नल ऑडीटचा अहवाल मागवला. हा अहवाल त्यांनी माहिती अधिकारातून मागवला. यावर देवस्थानने ‘हा न्यास सार्वजनिक प्राधिकरण या कक्षेत येत नाही. त्यामुळे या न्यासाला माहितीचा अधिकार २००५ लागू होत नाही’, हे कारण दाखवले व त्यासंबंधी कोणत्याही स्वरूपाची माहिती देण्यास नकार दिला व अर्ज निकाली काढण्यात आला, अशी माहिती दिली.

वास्तविक श्री. मार्तंड देवसंस्थान हा न्यास सार्वजिक न्यासाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे. मात्र देवस्थान व्यवस्थापनाने मनमानीपणा दाखवत माहिती अधिकाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. यावरुन विश्वस्त मंडळींचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रकार चव्हाट्यावर आलेला आहे.


Exit mobile version