Site icon Sprouts News

देवा, राज्यपालांना सुबुद्धी दे!

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स एडिटोरिअल

भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत आले आहेत. वादग्रस्त विधाने करणे व नंतर ‘सारवासारवी’ करणे याची त्यांना जणू सवयच लागलेली आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना वारंवार दुखावल्या जातात, याचाही राज्यपाल कोश्यारी यांनी विचार करायला हवा.

कोश्यारी यांच्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वप्रथमच राजभवनाच्या दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाले, याबाबत ‘स्प्राऊट्स’च्या टीमने विशेष लेख लिहून, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदनही केले. मात्र त्याचा इतका अतिरेक झाला की राजभवन हे ‘पुरस्कार वाटप केंद्र’ बनले गेले. टाइम्स, मिड- डे, पुढारी, सकाळ, लोकमत, नवभारत इतकेच काय इतरही सर्वच गल्लीतल्या वृत्तपत्रांनी राज्यपालांच्या हस्ते शेकडो जणांना पुरस्कार दिले. हे सर्व पुरस्कार या प्रसारमाध्यमांनी कथित विजेत्यांकडून चक्क ‘पैसे’ घेऊन दिलेले होते, असाही सामाजिक कार्यकर्त्यांचा स्पष्ट आरोप आहे.

सवंग प्रसिद्धीची चटक लागलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी या कामासाठी विलास मुणगेकर या भ्रष्ट अधिकाऱ्याला दोन वेळेला मुदतवाढ दिली. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेली ही मुदतवाढ बेकायदेशीर व संविधानाचा भंग करणारी आहे. मात्र राज्यपालांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याला कायमच ठामपणे सपोर्ट केला आहे. या अधिकाऱ्यामुळे पुरस्कार वाटप योजनेला बळ मिळाले आहे. आतापर्यंत हजारो जणांना राज्यपाल कोश्यारी यांनी ‘कोरोना वॉरियर’सारखे पुरस्कार दिलेले आहे. यातील काही जण हे कोरोनाकाळात घराबाहेरही पडले नाही, काही डॉक्टरांवर तर कोरोनाकाळात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामुळे हे पुरस्कार हे तर कोरोना काळात मृत्यू आलेल्या नागरिक व त्यांच्या नातलगांची क्रूर चेष्टा आहे, असा ‘स्प्राऊट्स’च्या टीमचा आरोप आहे.

सवंग प्रसिद्धीची कायमच चटक लागलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी आतापर्यंत सरकारी नियम धाब्यावर बसवून खिरापतीसारखे पुरस्कार वाटलेआहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड मधील गुन्हेगार, खंडणीखोर, गुंड, मनुष्यवधासारखे आरोप असलेले डॉक्टर यांनाही सन्मानित केले गेले. या समाजकंटकांनी राज्यपालांसोबतचे फोटो काढून प्रसारमाध्यमांत संपूर्ण पानभरुन जाहिरातीही दिल्या. विश्वासार्हता गमावलेल्या वृत्तपत्रांनी त्या प्रसिद्धही केल्या, ही प्रसारमाध्यमांची अवस्था आहे.

होलसेलमध्ये बोगस पीएचडी विकणाऱ्यांचा जाहीर सत्कार
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात होलसेलमध्ये पीएचडी विकणारा मधू क्रिशन नावाचा भामटा राजभवनात येतो व राज्यपालांसोबत ब्रेकफास्ट करतो, चर्चा करतो. राजभवनातील सरकारी सोशल मीडियावरुन त्याचे फोटोही व्हायरल केले जातात, यावरुन राजभवनातील भ्रष्टाचार किती तळागाळात पोहचला आहे, याची कल्पना येते.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बोगस मानद पीएचडी विकणाऱ्यांचा राज्यपालांचा हस्ते जाहीर सत्कार केला जातो. इतकेच नव्हे तर राजभवनातच बोगस पीएचडीचे वाटप केले जाते व हे संशयित आजही उजळ माथ्याने पुन्हा बोगस पीएचडी विकतात, तेही राज्यपालांसोबतचा फोटो वापरून, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

राजभवनातील अधिकारी भ्रष्टाचारी
राज्यातील शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे, यासंदर्भातील असंख्य गैरव्यवहार ‘स्प्राऊट्स’ने वारंवार उघडकीस आणले आहेत, राज्यपाल हे राज्याचे कुलपती आहेत, यामुळे ‘स्प्राऊट्स’ने हे भ्रष्टाचार त्यांच्याही निदर्शनास आणून दिले होते. मात्र राज्यपाल कोश्यारी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही. त्यामुळे मुणगेकर सारखे भ्रष्ट अधिकारी या गैरव्यवहार करणाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करुन ‘मॅनेज’ करतात, असा आरोप स्प्राऊट्सने जाहीररीत्या केला आहे, तसेच त्यासंबंधी लेखी तक्रारीही केल्या आहेत, मात्र त्याला राज्यपालांनी केराची टोपली दाखवलेली आहे. राज्यपालांच्या या बेपर्वाईमुळेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते की देवा, या राज्यपाल कोश्यारी यांना सुबुद्धी दे!


Exit mobile version