Site icon Sprouts News

महाराष्ट्राच्या पैशावर भाजप लढणार कर्नाटकची निवडणूक

कर्नाटक निवडणुकीसाठी शिंदेंना निधीचे टार्गेट

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

कर्नाटकने महाराष्ट्राचा कायमच द्वेष केलेला आहे, मात्र आगामी काळात भाजपने महाराष्ट्रातील पैशावरच कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा विडा उचलेला आहे आणि त्यासाठी आर्थिक रसद पुरविण्याचे आदेशही दिल्ली दरबारातून थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. मोदी यांनी या दोघांना भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला सांगितले. या बैठकीत शहा यांनी नुकत्याच होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून देशभरात आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या. या तिन्ही निवडणुकींमध्ये भाजपच्या प्रचारासाठी शिंदे यांनी अद्याप एक दमडीचाही पक्षनिधी दिलेला नाही, याबाबत शहा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

यापुढील कर्नाटक येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीसाठी त्यांनी त्वरित पक्षनिधी गोळा करण्याचे आदेशही दिले आहेत, अशी खात्रीलायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती मिळालेली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला डावलून शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, यामागे पक्षाला पहिल्यापेक्षा अधिक निधीची अपेक्षा आहे, हेही एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे शिंदे यांच्याकडून भाजपच्या वरिष्ठांना मोठ्या अपेक्षा आहेत.


या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिंदे यांनी हा आदेश शिरसावंद्य मानलेला आहे व त्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंत्राटे वाटण्याची तयारी सुरु केलेली आहे.

त्यानुसार विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे व महाराष्ट्राच्या पैशावरच महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या कर्नाटकची ही निवडणूक लढवली जाणार आहे.

भारतात होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यातून विविध पक्षातील प्रमुख नेत्यांना पक्षनिधीचे टार्गेट दिले जाते. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर असताना विलासराव देशमुख यांच्यावर ही जबाबदारी असे. त्यानंतर २०१४ उजाडले व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, साहजिकच त्याकाळात भाजपासाठी त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती.

अमित शहा हे फडणवीस यांना आगामी काळात पंतप्रधान पदाचे स्पर्धक मानत आहेत. त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे आणले. शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदाचे हे आव्हान स्वीकारले आहे,

मात्र त्यांना सतत फडणवीस यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. फडणवीस यांनीही अंतर्गत राजकारण खेळून शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुरते जेरीस आणले आहे. त्यातच अमित शहा यांनी दिलेल्या या नव्या आव्हानामुळे शिंदे यांची पुरती झोप उडालेली आहे, अशी खात्रीलायक माहिती ‘स्प्राऊट्स’ला मिळालेली आहे.

Exit mobile version