Site icon Sprouts News

मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’

निवडणुकीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

मुंबई महापालिका प्रशासन लोकसभा निवडणुकींच्या तयारीत गुंतले असल्याचा फायदा घेऊन मुंबई आणि उपनगरांत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. निवडणुकीचे कारण देत संबंधित अधिकारीही अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे टाळत आहेत, त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.

भांडुप पश्चिम येथील गावदेवी रोड परिसरात मागील तीन दिवसांपासून अनधिकृत बांधकाम केले जात आहे. याबाबत जागामालक संजीव कुमार सदानंदन यांनी पालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. मात्र पालिकेने सदरहू बांधकाम थांबविण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही.

गावदेवी रोड येथील द्वारकाप्रसाद दुबे चाळ (के. एस. नगर ) संजीवकुमार सदानंद यांच्या मालकीची आहे. तेथील एक भाडेकरू हरिलाल सीताप्रसाद यादव यांनी मालक अथवा महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता, सदर जागेत बेकायदा दुकान गाळे बांधण्याचे काम सुरु केले आहे.

सदर जागेबाबत मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये जुना वाद आहे. त्यात यादव यांनी सदर जागा रिक्त करावी, असा निवाडा लघुवाद न्यायालयाने २०१७ मध्येच दिला आहे. यादव यांनी याविरोधात अपील केले असून, प्रकरण आजही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा स्थितीत कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय बांधकाम करणे, हा एकप्रकारे न्यायालयाचा अवमान आहे.

तरीही निवडणूक काळात पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष गृहीत धरून यादव यांनी सदर जागेत पक्के बांधकाम सुरु केले. दुबे यांनी बांधकाम साहित्य आणल्यावर लगेच, संभाव्य धोका लक्षात घेऊन संजीव कुमार सदानंद यांनी एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. तसेच भांडुप पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडेही रीतसर तक्रार दिली. मात्र कुणालाही याची दखल घेण्यास वेळ मिळालेला दिसत नाही. संपूर्ण शहरातच अशाप्रकारे मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रकार सुरु आहे. निवडणुकीचे निमित्त करून, प्रशासनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, अशी हतबलता संजीवकुमार यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version