कोट्यवधी रुपयांची फसवणूक: अद्याप एफआयआर नाही
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात Coito नावाचे बनावट आभासी चलन बनविण्यात आले. या चलनात गुंतवणूक केल्यास तीन महिन्यात तिप्पट पैसे देण्यात येतील, असे अमिश दाखवून आतापर्यंत तब्बल ८ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना तब्बल ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातलेला आहे. याप्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र पोलिसांनी आरोपींनाच पाठीशी घालण्याची भूमिका घेतलेली आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथे इब्राहिम इनामदार, त्याची बायको जस्मिन इनामदार व भाऊ अब्दुल इनामदार हे कुटूंब राहते. या भामट्यांनी Coito नावाने फेक क्रिप्टोकरन्सी बनवली. या करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास अवघ्या तीन महिन्यात तिप्पट पैसे मिळवून देतो, अशी कथित गॅरंटी देण्यात आली, सुरुवातीस काही काळ रक्कम देण्यात आली मात्र नंतर मूळ रक्कमही देण्यात आलेली नाही. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे.
या भामट्यांनी ही सारी रक्कम रोखीत घेतल्याने याचा कागदोपत्री पुरावा मिळत नाही. मात्र या रकमेच्या बदल्यात लाखो रुपयांचे धनादेश Coito ने गुंतवणूकदारांना दिलेले होते. मात्र हे धनादेशही मागील तारखांमुळे कालबाह्य झालेले आहेत. असे धनादेश गुंडांकडून दडपशाही करुन परत घेतले जात आहे.
वरकरणी हा धंदा केवळ फसवणुकीचा वाटत असला तरी हा साखळी योजनेचाही भाग आहे. त्यामुळे ही योजनाही बेकायदेशीरपणे चालवली गेली. पोलिसांना हा प्रकार माहित असूनही त्यांनी आरोपींशी ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासले होते. त्यामुळे त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नव्हती.
आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० व इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण १८ गुंतवणूकदारांनी याविरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मात्र पोलिसांचे आरोपीशी ‘आर्थिक संबंध’ असल्यामुळे या आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे आरोपी मोकाट फिरत आहेत व पोलीस मात्र तक्रारदारांवरच दबाव टाकत आहेत.
पोलिसांच्या या भूमिकेमुळे गुंतवणूकदार संतप्त झाले व त्यांनी जनआंदोलनाच्या इशारा दिला होता, त्यामुळे अखेरीस या प्रकरणाचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा, असे आदेश पोलीस अधीक्षकांनी ‘आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागा’ला दिलेले आहेत. सन २०१९ पासून ही फसवणूक चालू आहे, आतापर्यंत असंख्य तक्रारी झालेल्या आहेत, मात्र पोलिसांनी अदयाप एकही एफआयआर दाखल न केल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आरोपी इनामदार कुटुंबीयांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाच हाताशी धरलेले आहे. त्यामुळे तक्रार करण्यास जाणाऱ्या गुंतवणूकदारांनाच त्यांच्यामार्फत धमकावले जाते. इतकेच नव्हे तर तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांवरच आरोपी जस्मिन इनामदार ही विनयभंगासारखे
( कलम ३५४, ३७६ ) गुन्हे दाखल करते व पोलिसही तातडीने हे कथित खोटे गुन्हे नोंदवत आहेत, असा आरोप तक्रारदार लतीफ मुल्ला या तक्रारदाराने ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.