उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
बनावट कागदपत्रे बनवून व कलेक्टरची परवानगी न घेता मुंबईतील एका कथित व्यावसायिकाने तब्बल ५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’ च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (एसआयटी) मिळालेली आहे.
महाबळेश्वर येथे निजामाचे वंशज नवाब मीर बरकत अल्लीखान बहादूर यांचा ‘वूडलॅण्ड’ नावाचा आलिशान बंगला आहे. हा बंगला कलेक्टर यांच्या जमिनीवर बांधलेला आहे. या बंगल्यावर दिलीप ठक्कर या कथित व्यावसायिकाने अनधिकृतपणे अतिक्रमण केले होते.
या बंगल्यावर कर्ज काढताना कलेक्टर किंवा तत्सम प्रशासनाची परवानगी घेणे, बंधनकारक आहे. मात्र ठक्कर यांनी बनावट कागदपत्रे बनवून शापूरजी पालनजी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून चक्क ५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या ‘एसआयटी’ला मिळालेली आहे.
सध्यस्थिती: काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण. या भागात हैद्राबाद येथील नवाब यांना ब्रिटिशांनी ९९ वर्षांच्या लीजवर दिलेला बंगला आहे. आजमितीला या बंगल्याची किंमत ही २५० कोटी रुपयांहून अधिक आहे. या बंगल्याची मालकी निजामाचे वंशज नवाब मीर बरकत अल्लीखान बहादूर यांच्याकडे हवी होती. मात्र मुंबई येथील व्यावसायिक दिलीप ठक्कर यांनी खोटे कागदपत्रे बनवली व त्या जागेवर अतिक्रमण केले, असा आरोप त्यांच्या वंशजांनी केला आहे.
त्यानंतर कलेक्टर रुचेश जयवंशी यांनी पोलिसांच्या मदतीने धाडसी कारवाई केली व या बंगल्याला सील लावले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले व हा बंगला आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेले आहे.