Education

डी.वाय. पाटील विद्यापीठ व जनतेच्या नजरेत धूळफेक करण्यासाठी आयुष विभागाकडून राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

1 Mins read

मागील कॉन्फरन्सचा पैसा पचविण्यासासाठी
वादग्रस्त माजी आयुर्वेद संचालक डॉ. कोहली ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कुमार हरीतला दिले नवीन कॉन्फरन्सचे टार्गेट

उन्मेष गुजराथी
स्प्राउट्स एक्सक्लूसिव

मागील कार्यक्रमाचे हिशेब आलेले नसताना आता पुन्हा राज्य सरकारचा आयुष विभाग, मुंबई परिसरातील सर्व आयुर्वेदिक महाविद्यालये, आरोग्य भारती यांच्या वतीने १६ व १७ फेब्रुवारी रोजी “लाईफस्टाईल डिसऑर्डर* या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने पुन्हा लाखो रुपये रोख स्वरूपात जमा करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमासाठी सशुल्क उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांवर सक्ती करण्यात येत असल्याने तसेच या परिसंवादाचे संयोजन आयुर्वेद विभागाचे वादग्रस्त माजी संचालक डॉ. कुलदीप कोहली तसेच डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे वादग्रस्त डीन महेश कुमार हरित यांच्याकडे सोपविण्यात आल्याने शिक्षक वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. डॉ कोहली निवृत्त झाल्यानंतरही त्यांना निरोप देण्यासाठी म्हणून लाखो रुपये गोळा करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, विद्यार्थी व शिक्षकांनी तक्रार केल्यामुळे तसेच जनता दलाने आवाज उठविल्यामुळे त्यावेळी हा कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ संबंधितांवर आली होती.

आता डॉ कोहली हे निवृत्त झाले असल्याने त्यांचा प्रशासनाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या कडे परिसंवादाची जबाबदारी सोपविण्याचा प्रश्नच येता नये. परंतु बनावट प्रमाणपत्रांच्या आरोपावरून चर्चेत असलेले महेशकुमार हरीत याना वाचवण्यासाठी व त्यांच्या व डॉ कोहली यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी या कार्यक्रमाचा वापर करण्यात येत असून यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या आयुर्वेद विभागाच्या यंत्रणा राबवून घेण्यात येत आहेत.

यापूर्वी १६ व १७ ऑगस्ट,२०१७ रोजी डी वाय पाटील महाविद्यालयातच तत्कालीन आयुर्वेद संचालक असलेल्या डॉ. कुलदीप कोहली ह्यांच्या मार्गदर्शनाखाली “डायबेटीस” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. निधी संकलनासाठी सर्व महाविद्यालयाना प्रतिनिधी नोंदणीसाठी लक्ष्य ठरवून देण्यात आले होते. शिक्षक वर्गासाठी अडीच हजार व विलंब शुल्कासह तीन हजार रुपये, तर विद्यार्थ्यांसाठी दोन हजार व विलंब शुल्कासह अडीच हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले होते. याशिवाय विविध कंपन्यांनी परिसंवादाच्या ठिकाणी आपापले स्टॉलही लावले होते. यातून लाखो रुपयांची जमवाजमव करण्यात आली.

हे पैसे ऑनलाइन व ऑफ लाइन अशा दोन्ही पध्दतीने जमा करण्यात आले होते. ऑनलाईनसाठी www.ayurvedseminarmaha.info नावाचे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले होते, जे आता बंद झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छापण्यात आलेल्या माहिती पत्रकावर या खात्याबद्दल कोणताही तपशील देण्यात आलेला नव्हता. तसेच त्यानंतर डॉ. कोहली निवृत्त झाल्याने या खात्यावरील जमा-खर्चाचा तपशील वा हिशेब जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे, याची कुणालाच माहिती नाही.

या खात्यावरील हिशेब दडपण्यासाठी व कुणावर काही बालंट येऊ नये यासाठी याच खात्याचा वापर आताच्या परिसंवादासाठीचा निधी जमा करण्यासाठी करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे माहिती पत्रकावर बँक खात्याचा तपशील देण्यात आला असला तरी व्हाॅटसअपच्या माध्यमातून मेसेज पाठवून रोख स्वरूपात व युपीआयच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळच्या परिसंवादाचे नाव “आयुर्वेद विझ्डम सोल्युशन फॉर लाइफस्टाइल डिस्ऑर्डर” असे असताना बँक खात्यावरील नाव मात्र “आयुष डायबेटीस सेमिनार” असे जुनेच देण्यात आले आहे. त्यामुळेच मागील हिशेब दडपण्यासाठी जुन्याच खात्याचा वापर करण्यात येत असून त्यामुळे आधी मागचे हिशेब जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे.

महेशकुमार हरीतची चौकशी NCISM ,MCIM, आयुष विभाग ह्याकडे प्रलंबित असताना त्यांच्याकडे या राष्ट्रीय परिसंवादाचे सचिव पद का देण्यात आले. या परिसंवादाला या विभागांचे महत्त्वाचे पदाधिकारी हजर राहणार असल्यामुळे त्यांच्याकडून हरीत यांच्या निःपक्षपाती चौकशीची अपेक्षा ठेवता येईल का, असेही सवाल केले जात आहेत.

महेश कुमार हरित यांची प्रतिमा डी वाय पाटील व्यवस्थापनाच्या व सामान्य जनतेच्या नजरेत उजळण्यासाठी तसेच त्यांना एकप्रकारे क्लीनचिट देण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे सचिवपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांची तसेच डॉ. कोहली यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता त्यांना या शासकीय परिसंवादाच्या आयोजनातून दूर ठेवण्यात यावे तसेच २०१६ च्या परिसंवादाचे हिशेब जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Related posts
Education

 तहसीलदाराने न्यायालयाचा अवमान करून नियमबाह्य पद्धतीने शेकडो घरे केली जमीनदोस्त

1 Mins read
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive बिल्डरच्या फायद्यासाठी तहसीलदाराने मुंबई उच्च न्यायालय व शिखर तक्रार निवारण समितीच्या नियमांचे उल्लंघन केले, व त्याआधारे आदेश काढून नियमबाह्य…
Education

 Tehsildar defies court order, illegally expropriates hundreds of houses

2 Mins read
Unmesh GujarathiSprouts Exclusive For the builder’s benefit, the tehsildar violated the rules of the Mumbai High Court and the Apex Grievance Redressal…
Education

 “Revital-H” is not life-supporting but life-less

2 Mins read
— No clinical data to support the ingredients in “Revital-H”— Vegetarian consumers beware of Non-vegetarian “Revital-H” Sprouts Exclusive Unmesh Gujarathi Although it…