Site icon Sprouts News

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या कार्यक्रमाला सरन्यायाधीशांनी उपस्थित राहू नये!

‘स्प्राऊट्स’च्या वतीने सरन्यायाधीशांना विनंतीपत्र

Unmesh Gujarathi,
Sprouts News #exclusive

हजारो कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडवणाऱ्या कंपनीची सखोल चौकशी चालू आहे. इतरही अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. याच कंपनीने एका खासगी कार्यक्रमासाठी भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे.

इतकेच नव्हे तर त्याची वृत्तपत्रांतून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे. मात्र सरन्यायाधीश यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास न्यायव्यवस्थेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे पत्रच ‘स्प्राऊट्स’च्यावतीने सरन्यायाधिशांना देण्यात आलेले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ या ग्रुपने २२ मार्च रोजी ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा खासगी कार्यक्रम दिल्ली येथे होणार आहे.

कार्यक्रमासाठी एक्सप्रेस ग्रुपने भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. वास्तविक या ग्रुपवर गैरव्यवहार यासंबंधीचे आरोप आहेत.

या ग्रुपचा मुंबई येथील नरिमन पॉईंट येथे मोठा टॉवर आहे. या टॉवरसाठी (एक्सप्रेस टॉवर ) लागणारा भूखंड हा महाराष्ट्र सरकारने भाडेपट्यावर दिलेला आहे. या ग्रुपचे मालक विवेक गोएंका यांनी या जमिनीच्या भूखंडाची बेकायदेशीरपणे विक्री केली.

त्यातून त्यांनी सरकारचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडवलेला आहे. या गैरव्यवहारासंबंधीच्या आरोपांविषयी चौकशीही सुरु आहे. (अर्थात ही चौकशी सहा वर्षांपासून कोणत्याही निकालाशिवाय प्रलंबित आहे.)

वास्तविक ‘द इंडियन एक्सप्रेस’ या ग्रुपच्या विरोधात अनेक दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्हा न्यायालयाने तर या ग्रुपवर ‘पीत पत्रकारिता’ केल्याबद्दल ताशेरे ओढलेले आहेत.

मागील वर्षी दिवाळीत मी या ग्रुपच्या मालकीच्या लोकसत्ता या वृत्तपत्राच्या संपादकांवर पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. याबद्दल या ग्रुपने वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आदर न करता माझ्यावरच २०० कोटी रुपयांचा दावा टाकलेला आहे.

ही केस मुंबई उच्च न्यायालयात आहे. या केसमध्ये माझ्याविरोधात डॉ. अभिनव चंद्रचूड हे वकील म्हणून केस म्हणून लढवत आहेत. ते ‘द इंडियन एक्सप्रेस’ या ग्रुपचे वकील आहेत.

डॉ. अभिनव चंद्रचूड हे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे चिरंजीव आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या २२ मार्चच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड उपस्थित राहणार आहेत. या पिता- पुत्रांच्या नात्याचा माझ्या केसवर परिणाम होण्याची मला भीती वाटत आहे.

इतकेच नव्हे तर ‘द इंडियन एक्सप्रेस’ ग्रुपने या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना बोलावले आहे, याबाबत या ग्रुपचा हेतू संशयास्पद आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणातून उर्वरित न्यायाधीशही प्रभावाखाली येवू शकतात.

सकस लोकशाही टिकवायची असेल तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहताना पुनर्विचार करावा, यासाठी ‘स्प्राऊट्स’ने थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांना विनंती करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रासोबत अनेक पुरावेही जोडलेले आहेत.

‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’चा घातक पायंडा

‘द इंडियन एक्सप्रेस’ ग्रुपचे अनेक दावे, खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, तर या ग्रुपचे व सरन्यायाधीशांच्या कुटुंबाचे सौहार्दपूर्ण व वैयक्तिक संबंध आहेत, असा चुकीचा संदेश जावू शकतो. याशिवाय या ग्रुपच्या संबंधित खटले चालवण्याऱ्या न्यायाधीशांवरही त्याचा प्रभाव पडू शकतो.

याच ग्रुपच्या वृत्तपत्रात डॉ.अभिनव चंद्रचूड हे स्तंभलेखक म्हणून लिखाण करीत असतात व याच ग्रुपचे ते न्यायालयीन कामही पाहतात. त्यांचे वडील सरन्यायाधीश आहेत व ते या वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहिले,

तर यावरून या कुटुंबाचे व या ग्रुपचे वैयक्तिक व कौटुंबिक घनिष्ठ संबंध आहेत, असा चुकीचा संदेश जावू शकतो. यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारावे, असे आवाहन ‘स्प्राऊट्स’ने नम्रपणे केलेले आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना एक्सप्रेस ग्रुपने आमंत्रण दिलेले आहे, मात्र या ग्रुपने दिलेल्या आमंत्रणाच्या हेतूविषयी शंका वाटत आहे. कदाचित आयोजकांचा हेतू चांगलाही असेल,

मात्र त्यामुळे उद्या सर्वच वृत्तपत्रे अशा खासगी कार्यक्रमाला सरन्यायाधिशांना बोलावतील, त्यामुळे चुकीचा व घातक पायंडा पडू शकतो व लोकशाहीच्या आरोग्यासाठी तो मारक आहे.

Exit mobile version