
पुण्यातील 62 वर्षीय महिलेला वाढदिवसाचे गिफ्ट पडले 4.42 लाखाला.. ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
- sprouts news network
- Nov 09, 2021
- 181 views
शहरात सोशल मीडियामाद्वारे फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्यापारी कुटुंबातील 62 वर्षीय महिलेला तब्बल 4.42 लाखाला गंडा घालण्यात आला आहे. संबधित महिला गणेशखिंड रोड येथे वास्तव्यास आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार सोशल नेट्वर्किंग साईट्सवरून तिची एका अनोळखी व्यक्तीसोबत ओळख झाली. सोशल मीडियावरून मित्र झालेल्या व्यक्तीने तो इंग्लडचा रहिवाशी असल्याचं महिलेला सांगितलं होत. त्यांच्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यानंतर पुढे फोन नंबरची देवाण घेवाण झाली. यातून नियमितपणे एकमेकांशी बोलणेही होऊ लागले, चॅटिंग सुरु झाले.
त्यानंतर अनोळखी व्यक्तीने पीडितेला तिच्या 24 एप्रिलच्या वाढदिवसादिवशी महागडे गिफ्ट पाठवणार असल्याचे सांगितले. मात्र या गिफ्टच्या हस्तांरणासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे पीडित महिलेला पटवून दिले. त्यानंतर महिलेला विश्वासात घेऊन बँक अकाऊंट सारख्या गोष्टींची माहिती काढून घेतली. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने स्वतःचे बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक अकाऊंट सुरु केले. अनोळखी व्यक्तीने पसरलेल्या या जाळ्यामध्ये पीडित महिला आपसूकच अडकली. त्यानंतर त्याने महिलेकडून 4.42 लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. काही दिवस झाल्यानंतर व्यक्तीने संपर्क करणे बंद केले. महिलेने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झालाच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
णे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पीडित महिलेची सोशल नेटवर्किंगद्वारे मैत्रीचे नाटक करत गुन्हेगाराने फसवणूक केली आहे. त्यासाठी सुरुवातीला महिलेसोबत मैत्री करून तिला विश्वासात घेण्यात आले. त्यानंतर तिच्या सोशल नेटवर्किंगच्या प्रोफाईलचा अभ्यास करून, तिच्या सोबत त्या पद्धतीने संबंध प्रस्थापित केले. कॉल करण्यासाठी आरोपीने बनावट सिमकार्ड वापरले तर बनावट कागदपत्राच्या आधारे बँक खाते काढत पीडितेला विश्वास दिला त्यानंतर तिची फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणी पीडितेने चतुःशृंगी पोलिसात तक्रार दाख केली. त्यानंतर हे प्रकरण पुणे सायबर पोलिसांकडे हस्तांतरीत केले आहे.
पीडित महिलेने आरटीजीस व्यवहाराद्वारे हस्तांतरीत केलेले पैसे नोएडा येथील दोन खासगी बँकेत जमा झाले असल्याची माहिती चतुश्रुंगी पोलिस स्थानकांचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दिली आहे.
Reporter