‘नाय वरनभात लोन्चा...’ चित्रपटाला

महिला आयोगाची चपराक
विकृत प्रदर्शनामुळे मराठी माणसात संताप
चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी


उन्मेष गुजराथी 

मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वपरिचित नाव असलेले निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर त्यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्या नव्या मराठी चित्रपटाची बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही चर्चा चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे होत असताना त्यामुळे महेश मांजरेकरांच्या चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या त्यांच्या चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे थेट राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

महेश मांजरेकर यांचा ‘वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटात मराठी माणसाची चाळ संस्कृती आणि गिरणी कामगार याविषयी करण्यात आलेले चित्रीकरण अंगावर येणारे आहे. यात चाळीतील महिला व बालकांबाबत दाखवताना मोठ्या प्रमाणात अश्लील दृश्ये, अनैतिक संबंध आणि हिंसक गोष्टींचा आधार घेण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर घडलेल्या ‘मराठी संस्कृती व चाळ संस्कृती’च्या दर्शनाने समाजमाध्यमे तसेच प्रसारमाध्यमातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. गिरणी कामगारांच्या नेत्यांकडून तर हा चित्रपट बंद पाडण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. मराठी  संस्कृतीत अनेक मुले वाढली त्या सर्वांनी असाच मार्ग धरला का, असा संतप्त सवाल करण्या येत आहे.

चित्रपटाला सेन्सॉरची कात्री लावा - राष्ट्रीय महिला आयोग
फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरच्या माध्यामातून ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर ज्याप्रकारे प्रसारित करण्यात आला तो करताना वयाचे कोणतेही बंधन पाळण्यात आले नाही. यामध्ये महिला व बालकांचे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे महिती व प्रसारण मंत्रालयाने याची तत्काळ दखल घ्यावी. लैंगिक दृश्यांना कात्री लावावी, त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनीही यासंदर्भात तत्काळ कारवाई करावी अशा सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.

मांजरेकर माणसातून उठलेत का,
चित्रपट चालू देणार नाही!

चित्रपट ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या पुस्तकावर आधारित असला तरी गिरणी कामगारांच्या बाबतीत असे एखादे उदाहरण त्यांनी बघितले असेल. याचा अर्थ गिरणी कामगार किंवा इथल्या चाळसंस्कृतीला चुकीच्याच पद्धतीने दाखवायचे असा होत नाही. गिरणी कामगार हा लढवय्या आहे तो अजूनही लढा देतोय. या चित्रपटात दाखवलेली संस्कृती कामगारवर्गाची नाही. कामगारवर्गाला पुढे करून समाजात विकृती पसरवण्याचे हे षडयंत्र आहे. महेश मांजरेकर माणसातून उठलेत का? हा इतिहास कामगारांचा नाही, त्यामुळे हा चित्रपट आम्ही चालू देणार नाही, असा इशारा गिरणी कामगार सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष  बी. के. आंब्रे यांनी दिला. गिरणी कामगारांनी पिशव्या विणणे, भाजी विकण्यापासून मेहनत केली. त्यांचे हे विकृत प्रदर्शन मांडू देणार नाही. मराठी माणूस आणि गिरणी कामगार या चित्रपटाचा तीव्र निषेध नोंदवेल. कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होता कामा नये, अशी प्रतिक्रिया गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उदय भट यांनी नोंदवली.

मराठी माणूस बदनाम होईल
‘परळ लालबाग’च्या गिरणी कामगारांच्या मुलांमध्ये सगळेच गँगस्टर नव्हते. मिल बंद झाल्यावर खूप मुलांनी कष्ट करून, पेपर टाकून, वडापाव विकून शिक्षण घेतलेय. आपल्या कुटुंबाला साथ दिलीय. हे असे दाखवून मराठी माणूस बदनाम होई दुसरं काय, अशी प्रतिक्रिया संजय भारतीय यांनी सोशल मीडियावर नोंदवली आहे. ‘लालबाग परळ’ आणि  या चित्रपटात फरक काय, असा सवाल केदार अजित यांनी ट्विटरद्वारे केला आहे. गिरणी कामगार विषयाच्या नावाखाली नागडे सीन, आई बहिणीवरून शिव्या दाखवल्या म्हणजे चित्रपट वास्तविक होतो का, असा सवाल त्यांनी केला आहे.

Reporter

  • Unmesh Gujarathi
    Unmesh Gujarathi

Related News