कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो…” ; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा!

शिवसेना नेते संजय राऊत हे उद्या(मंगळवार) पत्रकार परिषद घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना व केंद्रीय तपास यंत्रणांना सूचक इशारा दिला आहे. तसेच, उद्याची पत्रकार परिषद ही मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच होत आहे. उद्या शिवसेना पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे, असंही ते म्हणाले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं असल्याचं म्हणत या अगोदरही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलेला होता, आज पुन्हा एकदा त्यांनी मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून आलं.

माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ”त्यांचं(विरोधकांचं) लक्ष उद्या असायलाच पाहिजे आणि त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायलाच हवी. त्यांनी ऐकायला हवी, केंद्रीय तपास यंत्रणांचे जे प्रमुख आहेत, त्यांनी तर माझी पत्रकार परिषद आवर्जून ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष बोलणार नसून उद्या महाराष्ट्र बोलणार आहे. उद्या मराठी माणूस बोलणार आहे.”

होय, शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र –

”मला असं वाटतं उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे. हे तुमचे जे धंदे सुरू आहेत ते कदाचित उद्यानंतर बंद होऊ शकतात. मला खासकरून शिवसेनेला म्हणजेच महाराष्ट्राला जे काय म्हणायचे, आता हे उपटसुंभे म्हणतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र का? मी म्हणेल होय, शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र. शिवसेना हाच ११ कोटी मराठी माणसांचा आवाज आहे.” असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

आमच्या रक्तातच धाडस आहे आम्ही गांडूळ नाही –

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले की, ”कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो आणि इकडले भाजपावाले गांडुळासारखे बसून असतात. नाही, महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरोधात प्रतिकार करेल, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत हा वंश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे दाखवू. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सेना भवानाखाली आहोत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढण्याची जी मर्दानगी शिकवली आहे ती उद्या दिसेल उद्या काय आहे ते. आमच्या रक्तातच धाडस आहे आम्ही गांडूळ नाही आहोत. कुणी महाराष्ट्रवार उठावं बाहेरची लोक यावेत आणि मराठी माणसांना इकडे दमदाट्या कराव्यात, असं नाही होणार, आम्ही लढू.”


उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच उद्याची पत्रकारपरिषद –

याचबरोबर, ”स्वत: उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचे उद्याच्या पत्रकार परिषदेवर बारीक लक्ष आहे आणि त्यांच्या सूचनेनुसारच उद्याची पत्रकारपरिशषद होत आहे. ते जिथे बसणार आहेत, तिथून त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. हे काय पोलखोल नाही, त्यांना(विरोधकांना) खोलायला किती वेळ लागतो. त्यांच्याकडे आहे काय? सगळे पोकळ आहेत. जय महाराष्ट्र!” अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Reporter

  • sprouts news network
    sprouts news network

Related News