शिवसेनेची उर्दू भवनासाठी तत्परता, डबेवाला भवनाबाबत नाकर्तेपणा

 उन्मेष गुजराथी 

शिवसेनेने २०१७ साली महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन उभारू, असे आश्वासन दिले होते, तसे वचननाम्यात म्हटले होते. ५ वर्षांनंतर २०२२ मध्ये जेव्हा महापालिकेची पुन्हा निवडणूक आली आहे, अशा वेळी भाजपने निवडणुकीच्या तोंडावर सेनेला या मुद्याची आठवण करून दिली आहे. त्यासाठी शिवसेनेवर गंभीर आरोपही केले आहेत. डबेवाला भवनाआधी सेनेने मुंबईत उर्दू घर बांधण्याचा घाट घातला आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डबेवाला भवनावरून चांगलेच राजकरण रंगत चालले आहे.

२०१७च्या वचननाम्यात दिलेले आश्वासन

शिवसेनेने २०१७ साली महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मुंबईतील ५ हजार डबेवाले आणि त्यांच्या कुटुंबियांचे मन वळवले होते. मुंबईकरांची नोकरीच्या ठिकाणीच भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांसाठी विसाव्याकरता हक्काची जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी निवडणुकीच्या वचननाम्यात 'डबेवाला भवना'चा उल्लेख केला होता. मात्र महापालिकेत सत्ता आल्यावर ५ वर्षे सत्ता उपभोगल्यावर जेव्हा पुढची निवडणूक तोंडावर आली, तेव्हा भाजपने सेनेला या आश्वासनाची आठवण करून दिली. ही आठवण करून देताना गंभीर आरोप केले. मागील ५ वर्षे शिवसेना डबेवाला भवनासाठी जी तत्परता दाखवत नाही, ती तत्परता मात्र मुंबईत उर्दू घर बांधण्यासाठी दाखवत आहे. मालेगावात उर्दू घर बांधून ठेवले, त्याचे नामकरण 'हिजाब गर्ल' मुस्कान खान हिचे नाव देण्यात आले, त्याला सेनेने मूकसंमती दिली, नांदेड उर्दू घराला सुरुवात केली, त्यासाठी १ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा विरोधाभास नाही का? मुस्लिम मतांचा लांगूलचालनासाठी शिवसेना राज्यासह मुंबईतील उर्दू घरासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. 

डबेवाला भवनाचे फक्त आश्वासनच! 
स्प्राऊट्स इन्व्हेस्टीगेशन टीमने जेव्हा या आरोपाची शहनिशा केली, तेव्हा वस्तुस्थिती समोर आली आहे. शिवसेनेला डबेवाल्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला, हे निश्चित आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात महापालिकेची टर्म संपत आहे, तोपर्यंत सेनेने डबेवाला भवनाविषयी कोणताही ठोस निर्णय घेतला नव्हता, अखेर भाजपने हा विषय उचलून धरला. त्यानंतर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी  मागील आठवड्यातील सभागृहात सर्वसाधारण सभेत बोलताना महापालिकेने डबेवाल्यांच्या भवनासाठी वांद्रे येथील एच वॉर्ड मध्ये  २८६.२७ चौ.मी.जागा दिल्याचे सांगितले. मात्र नुसते सभागृहात सांगून भवन उभे राहत नाही. त्यासाठी तसा ठराव सभागृहात आणावा लागतो, तो मंजूर करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आणि आता मार्च २०२२ यामध्ये महापालिकेची टर्म संपत आहे. सेनेच्या सत्तेला स्थगिती मिळत आहे. अशा वेळी केवळ एकच सर्वसाधारण सभा होणार आहे. तोवर हा ठराव कधी करणार आणि तो त्या शेवटच्या सभेत मंजूर होणार का, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे डबेवाला भवन पुन्हा एकदा २०२२ च्या वचननाम्यात समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे.

Reporter

  • Unmesh Gujarathi
    Unmesh Gujarathi

Related News