Site icon Sprouts News

आमिषापोटी पत्रकारांना दिल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी

रत्नागिरी येथील रिफायनरीच्या विरोधात आवाज दाबण्यासाठी पत्रकारांनाही केले ‘मॅनेज’

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

रत्नागिरी येथील विनाशकारी रिफायनरीच्या विरोधात स्थानिक जनतेमध्ये प्रक्षोभ आहे. या प्रक्षोभाला वाचा फुटू नये. म्हणून प्रसारमाध्यमांनाच ‘मॅनेज’ करण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक पत्रकारांना तर थेट जमिनीच आमिषापोटी दिलेल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आलेली आहे.

‘टीव्ही ९ मराठी’चे स्थानिक पत्रकार मनोज लेले, ‘मुंबई आजतक’चे राकेश गुडेकर आणि ‘साम’चे अमोल कलये यांना पंढरीनाथ आंबेरकर यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी अमिषापोटी दिल्या आहेत. यासंबंधीचा सातबारा उताराच ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीच्या हाती आलेला आहे.

या सातबारात स्वतः प्रमुख आरोपी आंबेरकर सुद्धा जमीन मालक असल्याचे दिसून येत आहे. आंबेरकर हाच अशी जमिनी गिफ्ट देण्याचे प्रकार करायचा. या पत्रकारांना विविध कामांसाठी लागणारी प्रकल्पातील कंत्राटेसुद्धा मिळणार आहेत. याशिवाय प्रकल्पग्रस्त दाखला, नोकरी किंवा नुकसानभरपाई तर मिळेलच. स्मार्ट सिटीत घरसुद्धा हातात येणार आहे. हे सर्व फायदे समोर ठेवत रत्नागिरी परिसरातील बहुतांशी दैनिके, टीव्ही आणि सोशल मीडियाचे पत्रकार यांना आंबेरकर ने आपल्या बाजूने वळवले आहे. परिणामी सध्या वारिसे यांच्यासारखा एखाद दुसरा पत्रकार याला अपवाद ठरत होता.

पंढरीनाथ आंबेरकर हा भूमाफिया आहे. रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार यांना दहशत दाखवण्याचे काम हा आंबेरकर करीत असे. याच आंबेरकर याने पत्रकार शशिकांत वारिसे याची अंगावर अवजड जीप घालून हत्या केली. सध्या हा प्रमुख आरोपी अटकेत आहे.

केवळ स्थानिकच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांत रिफायनरीसंदर्भात बातम्या येवू नये, याची काळजी रिफायनरीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर करत असतात. त्यासाठी या काही प्रमुख प्रसारमाध्यमांच्या मालक व संपादकांना ‘पाकिटे’ देण्याचे काम नागवेकर करीत असतात. जे पत्रकार ही आमिषे, धमक्या यांना भीक घालत नाहीत. त्यांना अगदी जीवे मारण्यातही येते, ही सर्व कामगिरी आरोपी पंढरीनाथ आंबेरकर करीत असे. आरोपी आंबेरकर हा नागवेकर यांचा उजवा हात मानला जात आहे. त्यामुळे वारिसे यांच्या हत्या प्रकरणात निगवेकर यांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

भीतीपोटी पत्रकारांनी नातेवाईकांच्या नावावर घेतल्या जमिनी
‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेल्या कागदपत्रांमध्ये वरील पत्रकारांना आंबेरकर ने जमिनी दिल्याचे आढळून येते. काही पत्रकारांनी मात्र स्वतःच्या नावावर जमिनी न घेता नातेवाईकांच्या नावांवर जमिनी घेतल्याचे दिसून आले आहे. नाणार प्रकल्प जाहीर झाल्यापासून आंबेरकर हा जमीन माफिया म्हणून समोर आला. त्याने गुजरात, राजस्थान, दिल्लीमधील लोकांनासुद्धा ‘स्थानिक शेतकरी’ दाखवून बेकायदेशीरपणे जमिनी विकलेल्या आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, मात्र ही चौकशी ‘मॅनेज’ होण्याची शक्यता अधिक आहे.
Exit mobile version