झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासनाने सर्वसाधारण सभेतील ठरावाची पडताळणी केली. या पडताळणीच्या आधारे बिल्डरला महत्त्वाच्या विकास परवानग्याही दिल्या. मात्र या परवानग्या देताना त्यांनी आधार घेतलेल्या ठरावातील स्वाक्षऱ्या या बोगस होत्या, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे.
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
सायन- चुनाभट्टी येथील शेकडो रहिवाशांची घरे बेकायदेशीरपणे पाडण्यात आली. ही घरे पाडण्यापूर्वीच या रहिवाशांच्या नियोजित सोसायटीची सर्वसाधारण सभा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी या सोसायटीच्या प्रांगणात पार पडली. या सभेत संस्थेचे सभासद व रहिवाशी उपस्थित होते. या बैठकीत विकास करारनामा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला. त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला.
गोंधळाला कंटाळून अर्ध्याअधिक सभासदांनी सभात्याग केला. अशावेळी नियमानुसार सभा तहकूब होणे गरजेचे होते. मात्र तरीही ही सभा कमिटीने तशीच चालू ठेवली. त्यावेळी करारनाम्यातील अन्यायकारक तरतूदी सर्वांना मान्य आहेत, असे दाखवून त्या ठरावावर १२२ रहिवाशांच्या सह्या घेण्यात आल्या.
या १२२ सह्या करणाऱ्यांपैकी सुमारे ४५ सह्या या खोट्या आहेत. या ४५ नावांच्या सहीच्या ठिकाणी ‘सून’, ‘पत्नी’, ‘मुलगा’ ‘मुलगी’, ‘मी स्वतः’ असे लिहिलेले आहे. तसेच काही ठिकाणी सह्याच केलेल्या नाहीत, तर काही सभासदांची नावे दोनदा लिहिलेली आढळतात.
या नियोजित सोसायटीमध्ये २९२ सभासद दाखविण्यात आलेले आहेत. यापैकी ५१ टक्के म्हणजेच किमान १४७ सभासदांची लेखी मान्यता आवश्यक असते. मात्र फक्त १२२ सभासदांच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत. यापैकी ४५ सभासदांच्या सह्या बनावट होत्या.
याच बनावट सह्यांच्या आधारे हा ठराव मंजूर करण्यात आला. हाच ठराव नियोजित कमिटी व किंग्ज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासनाला सादर केला.
ठरावाच्या आधारे ‘एसआरए’ प्राधिकरण प्रशासनाने बिल्डर निलेश कुडाळकर (किंग्ज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ) यांना महत्त्वाच्या परवानग्या दिल्या. या परवानग्यांमध्ये लेटर ऑफ इन्टेन्ट (हेतू आशय पत्र ), इन्टिमेशन ऑफ अप्रूव्हल (IOA) व कमेन्समेंट सर्टिफिकेट (कार्यारंभ आदेश ) या परवानग्यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
सायन- चुनाभट्टी येथील हिल रोड वरील (प्लॉट नंबर ३७३ व २९५ वर) दोन म्हाडा नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेमधील घरे सन १९६० पूर्वीपासून तेथे उभी होती. मात्र २०१४ मध्ये सायन चुनाभट्टी श्री. गुरुदत्त कृपा को. ऑप. हौसिंग सोसायटी (नियोजित ) ही संस्था सदस्य नसलेल्या रहिवाशांकडून स्थापन करण्यात आली. त्यासाठी दाखविण्यात आलेल्या मीटिंग्ज व त्याची कार्यपद्धती बेकायदेशीर आहे.
या ( म्हाडा नोंदणीकृत) दोन्ही सोसायटयांमधील रहिवाशांनी त्यांची घरे तोडण्याची कारवाई थांबविण्यासाठी स्थगिती अर्ज ( stay application) दिलेला होता. या अर्जावर सुनावणी प्रलंबित होती.
मात्र तहसीलदार उमेश पाटील यांनी केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी शेकडो घरे जमीनदोस्त करण्याचा आदेश काढला व ही घरे तात्काळ जमीनदोस्त करण्यात आली. हा आदेश संपूर्णतः नियमबाह्य पद्धतीने काढल्याचे मिळालेल्या कागदपत्रांतून आढळून येत आहे.