महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवस्थानाला दानरूपी मिळालेल्या जमिनीची बेकायदेशीररीत्या विक्री करण्यात आलेली आहे
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
त्यातून कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा करण्यात आली, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (एसआयटी) माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांतून उपलब्ध झालेली आहे.
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात खंडोबा देवाचे मंदिर आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशविदेशातील भाविक जेजुरीला येतात. यातील असंख्य भाविकांनी श्रद्धेने पैशासोबत जमिनीही दानस्वरुपात दिलेल्या आहेत.
जमिनी दान करण्याची परंपरा ही फार पुरातन आहे. छत्रपती शाहू महाराजांनीही ( son of Chhatrapati Sambhaji and maharani Yesubai, Satara Dynasty ) या देवस्थानाला शेकडो एकर जमिनी दानस्वरुपात दिल्याची नोंद आहे. तसेच त्याचे मोडीलिपीतील दस्तऐवजही ‘स्प्राऊट्स’च्या हाती आले आहेत.
या दानस्वरूपातील जमिनींची कोणत्याही स्वरुपात विक्री करू नये व शेतीव्यतिरिक्त कुठल्याही स्वरुपात वापर करू नये, असा सरकारी नियम आहे व सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही आहे. या जमिनी शेतकामासाठी कसायला दिलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सांगवी हे छोटेसे गाव आहे. या गावात देवस्थानची २३ एकर जमीन आहे. यातील काही एकर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आलेली आहे. या विक्रीसाठी वहिवाटदारांना बेकायदेशीरपणे लेखी परवानगी देण्यात आली.
परवानगी तत्कालीन विश्वस्त मारुती सर्जेराव गावडे यांनी श्री. मार्तंड देवस्थानच्या लेटरहेडवर दिनांक २५ मे २००८ रोजी दिली. या लेटरहेडवर आवक- जावक क्रमांक व इतर विश्वस्तांच्या स्वाक्षऱ्याही नाहीत.
तत्कालीन विश्वस्त गावडे यांच्या परवानगीने या जमिनीचे वहिवाटदार बाबासो हरिबा मोहिते व जनाबाई बाबासो मोहिते यांनी ही जमीन ८ जणांना विकली व त्यातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा गोळा केला.
जेजुरीच्या श्री. मार्तंड देवसंस्थान या ट्रस्टमध्ये प्रचंड महाआर्थिक घोटाळे यापूर्वी झालेले आहेत. याविरोधात ट्रस्टच्या माजी विश्वस्त नंदा राऊत व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कदम यांनी वारंवार आवाज उठवलेला आहे.
प्रकरणातही या सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धर्मादाय आयुक्त (मुंबई ) महेंद्र महाजन, सहधर्मादाय आयुक्त (पुणे ) सुधीरकुमार बुके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (पुणे ) यांच्याकडे तक्रार केली आहे. व त्याचा सातत्याने पाठपुरावाही करत आहेत.
दान दिलेल्या या २३ एकर जमिनीपैकी काही भूखंडाची २५ मे २००८ रोजी बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आली. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे या २३ एकर जमिनीवर वहिवाटदारांनी ३१ जून १९८७ रोजी बेकायदेशीरपणे कर्जही काढलेली होती, अशी माहितीही ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांतून मिळालेली आहे.