Site icon Sprouts News

‘भाजप’च्या वाटेवर ‘आप’  

z

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही हळूहळू नव्हे तर फारच वेगाने काँग्रेसकडे चालू आहे. भाजपपेक्षा काँग्रेस कैकपटीने चांगली होती, असा मतप्रवाह वाढत चालला आहे. यातुलनेत मतदारांनी दिल्ली, पंजाबसारख्या राज्यांत नवा पर्याय निवडला. ‘आप’च्या झाडूला मतदारांनी पसंती दिली. मात्र हळूहळू आपची वाटचालही पूर्वीच्या काँग्रेस व आताच्या भाजपकडे जावू लागल्याची चिन्हे दिसू लागत आहेत.

दिल्ली विधानसभेत ‘आप’ची मागील सलग ९ वर्षांपासून सत्ता आहे. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत ‘आप’ व या पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा इमानदार व स्वच्छ प्रतिमेची अशी आहे. मात्र त्याला तडा देणारी ही धक्कादायक बातमी आहे.

दिल्ली येथील कामाची प्रसिद्धी करण्यासाठी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील प्रसारमाध्यमांना तब्बल ९७ कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या होत्या. वास्तविक या कामाची जाहिराती फक्त दिल्ली येथील प्रसारमाध्यमांना देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी चक्क देशभरातील प्रसारमाध्यमांना जाहिराती दिल्या.

राजकीय लाभासाठी त्यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली, असा आरोप दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर ‘आप’ने हे ९७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत भरण्याचे आदेशही सक्सेना यांनी दिले आहेत.

पंजाब सरकारनेही अशाच प्रकारे देशभर जाहिरातबाजी करुन जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता अकाली दलाने केली आहे.जनतेला ‘आप’ पक्षाकडून अशा उधळपट्टीची अपेक्षा नव्हती, असेही अकाली दलाने म्हणले आहे.

दिल्लीच्या उपराज्यपालांना उत्तर देताना ‘आप’ने आरोप केला आहे की, भाजपशासित राज्य सरकारांनी याआधी २२०० कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत, त्यांनीही ही रक्कम सरकार दरबारी जमा करावी.

पंजाबमध्ये आज ‘आप’चे सरकार आहे. या सरकारमध्ये निवडून आलेल्या ‘आप’च्या ५० टक्क्यांहून अधिक आमदारांवर क्रिमिनल केसेस आहेत. यापैकी २३ टक्के आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमकडे आलेली आहे.


Exit mobile version