Exclusive

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित 

1 Mins read

पुण्यातील आगामी ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

पुण्यात दि.५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित करण्यात आली असून ‘आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाला आहे’ असा दावा एड.राधिका कुलकर्णी यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून तसेच पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.संगीतकार अजय-अतुल यांनी मागे एका कॉन्सर्ट वेळी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करून एड.राधिका कुलकर्णी या आयोजक महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी काळे झेंडे घेऊन ५ मे रोजी निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. याआधीही दि.२१ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर पोलीस परवानगी घेऊन निदर्शने केली होती.

दि.५ मे रोजी पुण्यात दुसऱ्या एका आयोजकाकडून महालक्ष्मी लॉन्स येथे ‘अजय अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट आयोजित करण्यात येणार असल्याचे समजताच एड.राधिका कुलकर्णी यांनी त्याठिकाणी निदर्शने आयोजित करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडे मागितली होती.हा ‘अजय-अतुल लाईव्ह’ कॉन्सर्ट स्थगित करण्यात आला असून आमच्या प्रस्तावित निदर्शनांमुळे शो स्थगित झाल्याचा दावा एड.राधिका कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.दरम्यान,’बुक माय शो’ वरील प्रकटनात निवडणुकांचे कारण आयोजकांच्या वतीने देण्यात आले असले तरी ‘कलाकार आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेचा विचार करता हा शो पुढे ढकलत आहोत’ असेही म्हटले आहे.

बालेवाडी येथे मागे २०१७ मध्ये झालेल्या कॉन्सर्ट मध्ये संगीतकार अजय-अतुल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करून एड.राधिका कुलकर्णी या आयोजक महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी काळे झेंडे घेऊन २१ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर निदर्शने केली होती.तसेच घोषणाबाजी केली होती. अजय-अतुल तेथे पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.निदर्शनानंतर एड.कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना अजय-अतुल यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला होता.या प्रकरणी आजपर्यंत संगीतकार अजय-अतुल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

काय आहे फसवणुकीचा आरोप?

एड.राधिका कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागीदार असलेल्या गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने सन २०१७ साली संगीतकार अजय -अतुल यांची बालेवाडी स्टेडियम येथे कॉन्सर्ट आयोजित केली होती. या कॉन्सर्टसाठी अजय -अतुल यांना मानधन द्यायचे ठरले आणि देण्यात आले. ईमेलवर कबूल केल्याप्रमाणे ठरलेले नामवंत कलाकार त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ठरलेले मोठे कलाकार आले नाहीत.गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला काही कोटी रुपयांचा फटका बसला. अनेक गुंतवणूकदार यामुळे हवालदिल झाले .

‘ गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने त्यांचे कोट्यवधी रुपये वसूल व्हावेत व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत याकरिता कलर्स मराठी चॅनलला संबंधित लाईव्ह कॉन्सर्ट प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला.संगीतकार अजय-अतुल यांनी या इव्हेंटचे आयोजक स्वतःच असल्याचे सांगून कलर्स मराठीला प्रसारणाचे हक्क विकले.त्यातून मोठी कमाई केली.अशा तऱ्हेने त्यांनी गायक म्हणून मानधन घेतले,ठरलेले कलाकार तर नाही आणले,पुढे स्वतःच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठीला हक्क विकले. फसवणूक करत संगीतकार गायक अजय अतुल जोडीने ही रक्कम हडप केली.पाठपुरावा करणाऱ्या आयोजकांना प्रतिसाद दिला नाही.’,असा आरोप एड.कुलकर्णी यांनी निदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केला.

मात्र,अजय अतुल यांनी संबंधित कॉन्सर्टचे आयोजक आपण स्वतः असल्याचे भासवून परस्पर कलर्स मराठीकडून पैसे गैरमार्गाने स्वतःच्या नावावर घेतले आहेत. तर दुसरीकडे कॉन्सर्टसाठी आलेल्या विदेशी ऑर्केस्ट्रा बँड पथकाला देखील गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंटने वेगळी रक्कम दिलीय. यामुळे गोल्डन एंटरटेनमेंट कंपनीला सर्व बाजुंनी कोटयवधी रुपयांचा फटका बसला आहे.एक रुपया देखील नफा मिळालेला नाही. यामुळे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीचे संचालक संपूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत.

‘एकीकडे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीकडून कॉन्सर्टसाठी पैसे वसूल करायचे तर दुसरीकडे कलर्स मराठी चॅनलला आपणच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठी कडून कईक कोटी रुपये उकळायचे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत व मनी लॉन्ड्रीग देखील झालेली आहे, त्यामुळे अजय अतुल यांच्या गैरमार्गाने कमविलेल्या रुपयांच्या संपत्तीची व रकमेची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी’,अशी मागणी एड.कुलकर्णी यांनी केली आहे.

कुलकर्णी पुढे म्हणाल्या,’या प्रकरणामध्ये फक्त हे अजय-अतुल दोषी नाहीत तर कलर मराठी चॅनल सुद्धा तेवढेच दोषी आहे. ते सामान्य लोकांनी तिकीट काढून येऊन कार्यक्रम बघितलेल्याचे व्हिडिओ आणि कलर्स मराठी चैनलने आयोजकांचे नाव एडिट करून प्रसारित करीत आहेत.आयोजकांचे नाव आणि लोगो कलर्स मराठी चॅनल कसं काढून टाकू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे व्हिडिओ आहेत.कलर्स मराठी ने २०१७ ची कॉन्सर्ट ही २०२२ मध्ये झालेली असे दाखवून सर्व रसिकांची फसवणूक केलेली आहे.कलर्स मराठी विरोधात यापूर्वीच एड.कुलकर्णी यांच्या भागीदाराने उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे’.

Related posts
Exclusive

Wilson College Students in Mumbai Prohibited from Sitting for Exams

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
Exclusive

Actor Sahil Khan arrested in Mahadev betting app case

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
Exclusive

Ban on MDH, Everest masala | India seeks details from food regulators of Singapore, Hong Kong

1 Mins read
मुंबईत ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’