उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
अवैधरित्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांच्या खरेदी- विक्री यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाला आढळून आले आहे, यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पुण्यातील वाकड येथे एस. रेमिडीस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीचे मालक प्रवीण अग्रवाल व पवनकुमार गोयल यांनी अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी आर्थिक संबंध जोपासले व अवैधरित्या औषधे बनवायला सुरुवात केली. या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली, अशी धक्कादायक बातमी ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मात्र तरीही या कंपनीचे उत्पादन अद्यापही चालूच असल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’कडे आहे.
बनावट औषधे बनवल्यानंतर त्यांची कंपनीच्या व इंडिया मार्ट सारख्या वेबसाइटवरून विक्री केली जात आहे. मात्र ही विक्री व खरेदी यामध्ये ताळमेळ आढळून येत नाही. यामुळे जीएसटी लायबिलिटी व इनपुट टॅक्स क्रेडिट (सेट ऑफ ) यांच्यामुळे गोधळ उडालेला आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी माहिती स्प्राऊट्सच्या हाती लागलेली आहे.
‘एस रेमिडिस’च्या कारखान्यावर अन्न व प्रशासन विभागाने धाड टाकली. या धाडीमध्ये त्यांना बनावट औषधे आढळून आली. विशेष म्हणजे औषधे बनविताना सक्षम अथवा तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित नव्हती, अशीही नोंद अन्न व प्रशासन विभागाने यावेळी केली आहे.