मेलेल्या डॉक्टरच्या नावाने बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे न्यायालयाला सादर करण्यात आली व त्याद्वारे फायनान्स कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
मुंबईत प्रशांती लँड डेव्हलपर्स व कांदिवली बालाजी इन्व्हेस्टमेंट या दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. या कंपन्यांचे नरेंद्र धीरजलाल शाह, हिमांशू नरेंद्र शाह व रेवती हिमांशू शाह हे संचालक आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातले आहेत. या कुटुंबीयांनी इंडिया इन्फोलाइन होम फायनान्स लिमिटेड (IIFL Home Finance Limited) व इतर विविध खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची रक्कम हजारो कोट्यवधी रुपयांची आहे.
या कर्जाची परतफेड या कुटुंबियांच्या कंपनीने केलेली नाही. त्यामुळे IIFL Home Finance Limited या फायनान्स कंपनीने दिल्ली येथील गुडगाव न्यायालयात धाव घेतली. मात्र तेथेही हे संचालक मंडळ न्यायालयात तारखेला हजर राहत नव्हते व कर्ज घेतलेली रक्कम देत नव्हते. अखेर न्यायालयाने या संचालक कुटुंबियांवर अटक वॉरंट काढले.
या अटकेपासून स्वतःला वाचविण्यासाठी या कुटुंबीयाने नामी युक्ती लढवली. या संचालकांनी डॉ. सूर्यकांत बी. शाह (पत्ता: बी. ४०६, कपूर अपार्टमेण्ट, चंदावरकर रोड, बोरिवली, पश्चिम ) या मृत डॉक्टरच्या नावावर बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे बनवली व ती सर्व न्यायालयाला सादर केली, अशी माहिती पुराव्यासह ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
या कुटुंबियांवर दिल्ली येथील द्वारका ( दक्षिण- पश्चिम) येथेही एकूण १५ हून अधिक खटले दाखल आहेत. तसेच भारतीय कायद्याच्या The Negotiable Instruments Act च्या १३८ कलमाखाली दिल्ली व गुरुग्राम न्यायालयात गुन्हेगार म्हणून नोंद आहे. याशिवाय त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल आहेत.
या आरोपी कुटुंबीयांनी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी या मयत डॉक्टरच्या नावाने बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत. हा न्यायालयाचा अवमान आहे व फौजदारी गुन्हाही आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या संचालक कुटुंबीय व मयत डॉक्टरच्या वारसांवर ( मुलगा: सुमित शाह ) त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने केलेली आहे.