उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
सन २००० ची गोष्ट आहे. मी मुंबईतील के. सी. कॉलेजमध्ये जर्नालिझमच्या वर्गात होतो. त्यावेळी तत्कालीन मुंबई महानगरपालिका आयुक्त गो. रा. खैरनार आले होते. खैरनार हे एक डॅशिंग व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. मुंबईतील असंख्य बेकायदा इमारतींवर त्यांनी बुलडोझर फिरवला होता. त्यावेळी त्यांनी गल्लीतल्या पुढारी, गुंडांपासून ते भेंडीबाजारामधील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बिल्डिंग जमीनदोस्त केल्या होत्या. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेही झाले, गोळ्याही झाडण्यात आल्या, मात्र ते कधीच हटले नाहीत. आज गौतम अदानीला भेटणाऱ्या व प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत मदत करणाऱ्या दुटप्पी शरद पवार यांच्यावरही खैरनार यांनी टीका केली होती. शरद पवार यांच्याविरोधात ट्रकभर पुरावे आहेत, असे त्यावेळी खैरनार म्हणाले होते.
के. सी. कॉलेजमध्ये खैरनार यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी घेतलेली होती. त्यावेळी मी खैरनार यांना प्रश्न विचारला की, ट्रकभर पुरावे तर सोडा; निदान बैलगाडी भरेल इतके तरी पुरावेही तुम्ही सादर केले नाहीत. खैरनार या प्रश्नावर प्रथम हसले व म्हणाले की, तुम्ही आताशी पत्रकारितेला सुरुवातही केलेली नाही, प्रत्यक्ष राजकारण हे फार वेगळे व भयानक असते. त्यात कुणाचा कधी कुणाकडून बळी घेतला जाईल, हे सध्या सरळ माणसाला माहीतही पडत नाही.
खैरनार यांचे म्हणणे आता मात्र मला वारंवार अनुभवायास येते. राजकारणात सरळ, नि:स्वार्थी माणसाचाच बळी दिला जातो. आध्यत्मिक गुरु व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व त्यांच्या वडिलांनी (नानासाहेब ) मोठ्या कष्टाने गावोगावी श्री परिवाराच्या शाखा निर्माण केल्या. त्याला त्यांच्या चिरंजीवांचीही साथ होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचाही ‘खैरनार’ केला, असे म्हणले तर चुकीचे होणार नाही. मागील चार दशकापासून वाढवलेल्या, जोपासलेल्या श्री परिवाराला खारघरमधील दुर्घटनेने डाग लावला.
श्री परिवार महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरत आहे, मात्र या दुर्घटनेमुळे सोशल मीडियावर श्री सदस्य व आप्पासाहेबांची यथेच्छ टिंगल उडवण्यात येत आहे. वास्तविक टिंगल करणाऱ्यांनी आधी ‘बैठक’ समजावून घेतली पाहिजे. परिवाराचे आध्यात्मिक व सामाजिक कार्यही तपासून घेतले पाहिजे. आप्पासाहेबांचे कार्य प्रचंड आहे, ते या भोंदू बागेश्वर महाराजांचा उदोउदो करणाऱ्यांना बापजन्मात समजणार नाही.
खारघरमधील घटनेपासून बोध घेतला पाहिजे. राजकारणातील दुर्गंधी परत कधीही श्री परिवारात यायला नको, याची दक्षता घेतली पाहिजे व या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शिंदे यांना स्वतःचे शक्तिप्रदर्शन करायचे होते, त्यानिमित्ताने राजकारणात आपण देवेंद्र फडणवीस यांना सक्षम पर्याय म्हणून उभे आहोत, हे दाखवायचे होते, त्यासाठी शिंदे यांनी ही ‘खेळी’ खेळली.
वास्तविक या मैदानावर मंडप घालणे सहज शक्य होते. मात्र ड्रोनने शूटिंग कशी करता येईल, असा विचार सडक्या मेंदूच्या पुढाऱ्यांनी विचार केला असावा. या मैदानात स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था ही लांब अंतरावर उभी करण्यात आलेली होती. तीही पुरेशी नव्हती. गरम पाण्याने तहान भागात नव्हती, इतकेच नव्हे तर अधिक पाणी पिल्यास लघवीला लांबवर जावे लागते, त्यामुळे बरेच जण पाणीही कमी पीत होते. या सर्व गोष्टींना सरकारचे ढिसाळ नियोजनही कारणीभूत होते. त्यामुळे चेंगराचेंगरीही झाली. त्यात ५० हून अधिक श्री सदस्य मृत्युमुखी पडले, असा अंदाज आहे. मात्र इथेही मृतांचा खरा आकडा लपवण्यात आला. प्रत्यक्षात हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
यात आणखी संतापाची बाब म्हणजे, या कार्यक्रमाची वेळ ही भर दुपारी ठेवण्यात आलेली होती. ती वेळ श्री सदस्यांनीच ठरवलेली होती, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. या रणरणत्या उन्हात पुढाऱ्यांची कंटाळवाणी भाषणे ऐकणे, हा तर अत्याचारच होता. वास्तविक गृहमंत्री अमित शहा यांना गोव्याला संध्याकाळी जायचे होते, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी दुपारची वेळ ठरवण्यात आलेली होती. त्यामुळे सामंत यांनी सरकारच्यावतीने केलेला हा आरोप अत्यंत संतापजनक आहे. सरकारवरचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे.
आप्पासाहेबांचे दर्शन मिळावे, म्हणून हजारो श्री सदस्य आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच आले होते. मात्र त्यांची जेवण, पाणी व राहण्याच्या बाबतीत आबाळ होती. कित्येक जण सहा तासांहून अधिक काळ भुकेले होते, असे आता मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे.
एकंदरीतच या गंभीर घटनेला कारणीभूत असणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ‘आप’चे धनंजय शिंदे यांनी खारघर पोलिसांकडे केलेली आहे.