माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाची अवमान केल्याबद्दल नोटीस
निवड समिती आणि प्रशासकीय अधिकारी आनंद मिलये यांच्याकडे तक्रार दाखल कुलगुरूपदासाठी थेट संघाचा पाठिबा ?
उन्मेष गुजराथी
शुक्रवार, दि. १९ रोजी मुंबई विद्यापीठासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग, पवई येथे मुलाखती होत आहेत. निवड समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डी.पी. सिंग, प्रशासकीय अधिकारी आनंद लिमये, प्रधान सचिव व आयआयटी बनारस येथील प्रमोद कुमार जैन यांचा समावेश आहे.
कुलगुरूपदाच्या शर्यतीत मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सध्या खूप चर्चेत असून त्यांचे बंधू उपेंद्र कुलकणों हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. आपणच कुलगुरू होणार अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.
भावाच्या भरवशावर आपण कुलगुरूपद मिळवू, असा त्यांना ठाम विश्वास वाटतो. त्याविरोधात आहे. मात्र अनेक शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी राज्यपाल महोदयांकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्या सर्व तक्रारी प्रलंबित आहेत.
माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या कार्यकाळात त्यांनी शासकीय नियमाच्या विरोधात जाऊन स्वतःसाठी ३० लाखांची गाडी घेतली. याबाबत राज्य सरकारने नेमलेली चौकशी अजूनही प्रलंबित आहे. शिक्षकांना संशोधनासाठी लागणारे अनुदानदेखील त्यांनी गेली २ वर्ष दिलेले नाही.
इतकेच नव्हे तर पीएचडी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवालदेखील विद्यापीठाच्या साईटवर उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे मुंबई विद्यापीठ NIRF रॅकिंगमध्ये मागे पडले. आता तर खुद सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोर्टाचा अवमान केला म्हणून नोटीस पाठविली आहे.
एवढे सगळे गौडबंगाल असूनही केवळ त्यांचा भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांना संघाचा आशीर्वाद मिळणार व तेच कुलगुरू होणार, अशी चर्चा विद्यापीठात रंगली आहे. परंतु संघाने खरच अशा निष्क्रिय माणसाला कुलगुरू करण्यासाठी पाठिंबा देण्याचे ठरविले आहे की काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शुक्रवारी कुलगुरूपदासाठी मुलाखती होत असताना आज छावा ब्रिगेड या संघटनेने निवड समितीतील प्रशासकीय अधिकारी आनंद लिमये यांच्या कार्यालयात भेट घेऊन रवींद्र कुलकर्णी यांच्या तक्रारीचा पाढाच सादर केला. तसेच तक्रारीची प्रत निवड समितीला दिल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निष्क्रिय रवींद्र कुलकर्णी यांना कुलगुरूपदासाठी अजिबात पाठिंबा देऊ नये, अशी विनंतीदेखील छावा ब्रिगेड या संस्थेने संघाला केली आहे.
याबाबत माजी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना फोन केला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला तर त्यांचे बंधू उपेंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.