महासंचालक भोज यांचे ‘जर्नालिस्ट असोसिएशन’ला आश्वासन
मुंबई, दि.५ (प्रतिनिधी):
महाराष्ट्र सरकारच्या कामांना वृत्तपत्रे कायमच प्राधान्याने प्रसिद्धी देत असतात. या वृत्तपत्रांचा सरकारी जाहिराती हा प्राणवायू आहे. त्यामुळे आजच्या चॅट जीपीटीच्या जगातही वृत्तपत्रे विश्वासार्हता टिकवून आहेत.
यातील नव्या वृत्तपत्रांनी मान्यताप्राप्त यादीत समावेश होण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाकडे अर्ज केलेले आहेत. यातील निकष पूर्ण करणाऱ्या वृत्तपत्रांचा लवकरच यादीत समावेश केला जाईल, असे आश्वासन विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांनी दिले.
‘जर्नालिस्ट असोसिएशन’ या पत्रकारांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महासंचालक भोज यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी नव्याने मान्यताप्राप्त यादीत समावेश होण्यासाठी विलंब होत असल्याचे नमूद केले होते.
यावर भोज यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. भोज यांच्या आश्वासनामुळे शेकडो वृत्तपत्राच्या मालकांना दिलासा मिळालेला आहे.
‘जर्नालिस्ट असोसिएशन’च्या अध्यक्षा अधिवक्ता स्मिता चिपळूणकर, कोषाध्यक्ष व ‘स्प्राऊट्स’ या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक उन्मेष गुजराथी, ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख, भीमराव धुळप, हेमंत रणपिसे, श्रीनिवासन चारी यांसह संस्थेचे पदाधिकारी व वृत्तपत्रांचे मालक उपस्थित होते.
काय आहे मागणी?
माहिती व जनसंपर्क विभागाच्या नव्याने मान्यताप्राप्त यादीत समावेश व्हावा, यासाठी संबंधित वृत्तपत्रांच्या मालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली होती. ही पूर्तता दिनांक २६ जुलै २०२२ रोजी केलेली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येवून कागदपत्रांची पाहणी केलेली होती.
मात्र तब्बल ६ महिने उलटून गेल्यानंतरही याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. या दिरंगाईमुळे या वृत्तपत्राच्या संबंधित मालकांना वृत्तपत्रे चालवणे मुश्किल होवू लागले आहे. त्यामुळे या सर्व मालकांनी ‘जर्नलिस्ट असोसिशन’च्या नेतृत्वाखाली महासंचालक भोज यांची भेट घेतलेली आहे.